अध्यात्मिक पाठबळाखेरीज कोणतेही शास्त्र पूर्ण होऊ शकत नाही, असे आमचे स्वत:चे अनुभवसिद्ध मत आहे. हे अध्यात्मिक बळ प्रत्येकाला त्याच्या विचाराने, नियतीने, कर्माने, साधनेने प्राप्त होत असते. त्याची तीव्रता प्रत्येकात वेगवेगळी आढळते. त्यामुळे या विषयाची जिज्ञासा साधताना स्वत: ज्ञानी असणे आवश्यक ठरते. वास्तूचा विचार केवळ वास्तू म्हणून न करता इतर अंगाने केल्यास हमखास चांगली फळे प्राप्त होतात.
“स्वामी मालिक” हे वास्तुशास्त्राची पाहणी, तपासणी करून उपाय सुचवताना व मार्गदर्शन करताना चार मुख्य दिशा, चार उपदिशा अधिक आकाश, स्थान(पाताळ), ब्रम्हस्थान अशा एकूण अकरा दिशा विचारात घेतात. सध्याच्या प्रचलित आणि बहुचर्चित वास्तुशास्त्राचा अभ्यास करणे व त्यायोगे मांडणी करणे सोपे आहे. मात्र प्रत्येक वास्तू ही शास्त्राच्या दृष्टीने वेगळी असल्याने प्रत्येक वास्तूचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास करून मगच सुचवलेले उपाय जास्त प्रभावी आणि फलदायी ठरतात, याची प्रयत्नांती उकल मिळाल्यानंतरच आम्ही या बारकावे टिपणा-या वेगळ्या पद्धतीचा उपयोग सुरू केला आहे. यात प्रामुख्याने आपला भर वास्तूतील लहरींवर असतो. या लहरींचे एक शास्त्र आहे. वास्तूतील 81 देव – देवता स्थाने, गंधर्व, यक्ष, राक्षस, किन्नर, क्षेम (लहरींचा एक प्रकार) या अभ्यासावर शास्त्र अवलंबून आहे. वास्तूचे उभे – आडवे 9 भाग केल्यानंतर बरोबर मधल्या स्थानावरती ब्रम्हदेवाचे अस्तित्व येते. हे स्थान मोकळे सोडण्याचा विचार झाल्यास हमखास चांगली फळे मिळतात. आम्ही यानुसार सुचविलेले उपाय अनेकाना फलदायी ठरलेत.
विशिष्ट वेळेची अनुकुलता आपण ज्योतिष आणि मुहूर्ताद्वारे तपासतो. त्याचप्रमाणे विशिष्ट वास्तूची अनुकुलता आपण संपूर्ण वास्तूशास्त्रात तपासतो. आणि हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व शुभाशुभ कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात जसे वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू, दिशांचे कारकत्व यांचा विचार केला आहे. तसे मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो, असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. एकूणात वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली गेली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे मनुष्याच्या हातात नसले तरी वास्तू निवडणे असते. वास्तू ही जर ‘शास्त्रोक्त` असेल तर तीत राहणा-यांना आरोग्य, संतती, संपत्ती,यावर त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात व तसे नसल्यास अशुभ परिणाम दिसून येतात. वेगळ्या अर्थाने वास्तू संपूर्णत: शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणा-या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर ? त्यामुळे या दोहोंचा विचार अनेक अर्थाने महत्वाचा आहे. फलज्योतिषात जसे ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात शास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. मात्र या सा-याची उकल करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन हवे. वास्तवात समप्रमाणातील चौकोनी वास्तू आपणाला चांगली फळे देते. किचकट दोष मात्र वास्तू तोडफोड करूनच दूर करावे लागतात. तोडफोड न करता देखील अनेकदा वास्तूदोष दूर करता येतात, कारण त्यात जवळपास 30% भाग हा व्यक्तीनिहाय मानसिक अधिक असतो. काही प्रमुख तत्वानुसार वास्तूपुरुषाची स्थापना आग्नेय कोप-यात हवी. कारण त्याचा संबंध खाण्याशी आहे. या वास्तूपुरुषाची पूजा नेहमी त्याला पालथा ठेवून केली जाते. वास्तूशांती करताना पृथ्वीवर अग्निदेवतेचा अधिवास असावा लागतो.
वास्तुशास्त्राच्या उर्जाचा अभ्यास आज आधुनिक शास्त्रात एकत्रितपणे केला जातो. १९५० ते १९६० दरम्यान हर्टमन या शास्त्रज्ञाने शोध लावला की जमिनीच्या पृष्ठभागावरती आणि जमिनीच्या विशिष्ट खोलीपर्यंत नैसर्गिकरीत्या विभागानुसार इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वॉल किंवा लहरी निर्माण होतात. यातून विशिष्ट प्रकारचे करंट पास होतात, हीच बाब आपणाकडे ऋषिमूनिनी हजारो वर्षांपूर्वी लहरींच्या माध्यमातून सांगितली होती. ज्यावर आज “स्वामी मालिक” कार्य करते आहे. आपल्या वास्तुपुरुष मंडलात विविध शिरा किंवा नाडी यांच्यामध्ये ऊर्जेचे प्रवाह असतात ते बाधित होऊ नयेत म्हणून विचार केला जातो. आपण वास्तुत मर्मस्थाने सांगतो, आज तीच विद्यान वेगळ्या भाषेत सांगते आहे. म्हणून आपण हा सांगोपांग विचार करून आपली एकूण कार्यपद्धती विकसित केली आहे.
घरच्या मुख्य दरवाज्याचि (सिंहस्थद्वार) चौकट(उंबरठा), मूळपुरुषाची बेडरूम, इतर बेडरूम, गेस्टरूम, विवाहितांची बेडरूम, अभ्यासाची खोली, गाड्यांचे पार्किंग, तुळस वृंदावन, किचन, देवघर, बाथरूम, अवजड वस्तूंची खोली, सेप्टिक टॅंक या प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. अशा या आणि इतर अनेक मुद्यांचा विचार आपण विस्तृतपणे पुढील लेखांकात करू या.
शब्दांकन : धीरज वाटेकर