शांतीकर्म – २

0

एकूणात शास्त्रात शांतीकर्म खूप असली तरी प्रवाहात कालसर्पशांती, राहुकेतुशांती, ग्रहणशांती आदी फार थोडी चर्चिली जातात, “स्वामी मालिक” मात्र जातकाची गरज जाणून त्यावर विचारपूर्वक कर्मकार्य सुचविण्याचे काम करते आहे. याची जाणीव आमच्याकडे यास्तव येणा-यांना नक्की आहे.

बालकाचा जन्म अमावस्येवेळी झाल्यास जननशांति करतात. या शांतीकर्माचे तीन प्रकार आहेत. हे शोधण्याकरिता अमावस्या काळाचे तीन भाग केले जातात. पहिला भाग चतुर्दशीयुक्त सिनीवाली अमावस्या, दुसरा दर्श अमावस्या, तीसरा प्रतिपदा युक्त कुहुवाली अमावस्या शांती होय. तसेच एखाद्या तिथीचा क्षय (क्षय म्हणजे तिथि संपण्याचा काळ) होत असताना जन्म झाल्यास रुद्राभिषेक विधी सांगितला आहे. एकाचवेळी पंचमी व षष्ठी, दशमी व एकादशी, पौर्णिमा व प्रतिपदा, अमावस्या व प्रतिपदा आदी दोन तिथीच्या संधिकालात अर्थात एक तिथी संपून दूसरी सुरु होतानाच्या 2 घटिकात (1 घटिका म्हणजे 12 मिनिटे) बालकांचा जन्म झाला तर जननशांति करावी, असे शास्त्राने सांगितले आहे. तसेच कर्क व सिंह, वृश्चिक व धनु, मीन व मेष या लग्न राशिंच्या सन्धिकालाच्या एक घटिकेत जन्म असल्यास जननशांति करावी. चतुर्थीच्या 8 घटिका, षष्ठीच्या 9 घटिका, अष्टमीच्या 14, नवमीच्या 25, द्वादशीच्या 10 घटिका या निषिद्ध तिथि घटिका तिथिमन्ध्ये जन्म असेल तर रुद्राभिषेक विधि आहे. रेवती व अश्विनी,आश्लेषा व मघा, ज्येष्ठा व मूळ या नक्षत्रांच्या सन्धिकालाच्या 4 घटिका मध्ये जन्म झाल्यास जननशांति सांगितली जाते. बालकाचा ग्रहनपर्व काळात जन्म झाल्यास, सूर्याचा जो संक्रमनकाळ असतो यात सूर्यसंक्रांति अगोदर वा नंतर 6 तासात जन्म झाल्यास, ग्रहण कारिदिन, कर्क मकरसंक्रांत,भाऊका अमावस्या, हुताशनि पौर्णिमा यावर जन्म झाल्यासही रुद्राभिषेक सांगितला आहे.

श्राद्ध हे सुद्धा एक शांतीकर्म आहे. “श्रद्धया क्रियते यत् तत् श्राद्धम्” ही श्राद्धाची व्याख्या आहे. श्रद्धेने जे जे केले जाते त्यास श्राद्ध म्हणतात. स्नेहाचे प्रतीक म्हणून तीळ, कर्तव्याचे प्रतीक म्हणून तांदूळ व भक्तीचे प्रतीक म्हणून पाणी या तीनही वस्तूंचा श्राद्धसमयी एकत्रित संयोग केला जातो. कर्तव्यपूर्तीची संधी आपल्याला श्राद्धाच्या निमित्ताने मिळत असते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्योत्तर प्रवास हा सुखमय, क्लेशरहित व्हावा. त्यांना सद्गती प्राप्त व्हावी याकारणे श्राद्धविधी केला जातो. हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतानुसार मानवाने देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण आदी चार ऋणे फेडणे अतिशय आवश्यक आहे. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध उपयुक्त ठरते. श्राद्धविधी हिंदुधर्माचा अविभाज्य घटक आहे. धर्मशास्त्रात ते गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून बजावण्यास शास्त्रात सांगितले आहे. शास्त्रनियमाप्रमाणे प्रत्येकाने हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध केले पाहिजे.

श्राद्धाचे प्रेतश्राद्धे व पितृश्राद्धे असे दोन प्रकार आहेत. यातील मृत्युनंतर सपिंडीकरण होईपर्यंत प्रेतास उद्देशून केलेल्या श्राद्धास प्रेतश्राद्ध (उदा : अवयवश्राद्ध, नवश्राद्ध, नग्नप्रच्छादनश्राद्ध, पाथेयश्राद्ध, अस्थिसंचयन श्राद्ध, वेदिकाश्राद्ध, महैकोद्दिष्टश्राद्ध, रुद्रगणश्राद्ध, वसुगणश्राद्ध, मासिकश्राद्ध ,अब्दपूरितश्राद्ध, सपिंडीकरणश्राद्ध, नारायणबली, नागबली, त्रिपिंडीश्राद्ध, इ.) म्हणतात. तसेच सपिंडीकरणानंतर गतव्यक्तीस पितृलोकाची प्राप्ती होते असे समजतात. त्यामुळे वर्षश्राद्धानंतर केल्या जाणा-या श्राद्धांना पितृश्राद्ध असे संबोधतात. यात एकास उद्देशून “एकोद्दिष्टश्राद्ध” व त्रयींना उद्देशून “पार्वणश्राद्ध” असे याचे दोन प्रकारही आहेत. उदा : तीर्थश्राद्ध, मातामहश्राद्ध, अक्षय्यतृतीयाश्राद्ध, घृतश्राद्ध, दधिश्राद्ध, पर्वश्राद्ध, भरणीश्राद्ध, उदकुंभश्राद्ध, सांवत्सरिकश्राद्ध, हिरण्यश्राद्ध, हस्तश्राद्ध, आमश्राद्ध, चटश्राद्ध, दर्शश्राद्ध, महालयश्राद्ध, अविधवाश्राद्ध, नांदीश्राद्ध, इ. होय. आपल्यातील पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढील प्रवासास साहाय्य करणे, ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल त्यांना पुढील गती प्राप्त करून देणे, जे पितर भूलोकी केलेल्या कुकर्मामुळे पितृलोकात जात नाहीत त्यांना भूतयोनीतून मुक्त करणे असे विविध हेतू श्राद्धविधी करण्यामागे शास्त्राने सांगितले आहेत.

श्राद्धाविषयी काही नियम आहेत. श्राद्धकर्मासाठी श्राद्धाची तिथी अपराह्णकाळी म्हणजे सामान्यपणे दुपारी दीड ते चार या काळात, ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी श्राद्ध तिथी नसताना सुद्धा सकाळ पासून दुपारी दोन – तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राद्धकर्म करता येते. एकाच दिवशी, एकाच तिथीला आई-वडीलांचे श्राद्ध करावयाचे असेल तर प्रथम वडीलांचे श्राद्ध करून नंतर आईचे श्राद्ध केले जावे. अशा वेळी दोन्ही श्राद्धांसाठी स्वतंत्र स्वयंपाक केला जावा, शक्य नसल्यास किमान भात व खीर स्वतंत्र करावी आणि इतर स्वयंपाक एकत्र करून त्याचे दोन स्वतंत्र भाग काढून ठेवावेत व श्राद्धाच्या वेळी त्या – त्या भागावर प्रोक्षण करावे. अपघातामुळे घरातील ३-४ व्यक्ती एकाच वेळी मृत पावल्यास त्यांची श्राद्ध तिथी एकच येते. अशावेळी कर्त्याने तीन-चार श्राद्धे शक्यतो एकाच दिवशी स्वत: करु नयेत. श्राद्धाच्या अधिकाराप्रमाणे क्रमाने योग्य अशा व्यक्तीने उर्वरीत श्राद्ध/श्राद्धे करावीत. तसेच श्राद्ध करण्यास अन्य कोणीही उपलब्ध नसल्यास पहिल्या दिवशी २ श्राद्धे करुन नंतर दुस-या दिवशी उर्वरीत श्राद्धे केली जावित. महालय आणि श्राद्ध एकाच दिवशी आल्यास प्रथम श्राद्ध नंतर महालय करावा. दर्शश्राद्ध आणि श्राद्ध एकाच दिवशी असेल तर प्रथम श्राद्ध करावे आणि नंतर दर्शश्राद्ध करावे.

पितृपक्षातील श्राद्ध विशिष्ट तिथीस केले जावे. त्या तिथीस करणे शक्य नसल्यास पितृपक्षातील चतुर्दशीचा दिवस सोडून अन्य कोणत्याही दिवशी करावे. काही कारणाने पितृपक्षात श्राद्ध करणे जमले नाही तर पंचांगात दिलेल्या महालय समाप्तीपर्यंत कोणत्याही दिवशी पितृपक्षातील करावयाचे राहिलेले श्राद्ध करावे. एखाद्या व्यक्तीचे अंत्यकर्म ज्या गावात केले असेल त्याच गावात १०, ११, १२ व १३ व्या दिवसांचे कर्म करावे असे नसून वास्तवात कोणत्याही ठिकाणी त्या दिवसांचे श्राद्धकर्म करता येते. दरवर्षीचे श्राद्ध किंवा पितृपक्षातील श्राद्ध सुद्धा कोणत्याही ठिकाणी करता येते. या सर्वांचा विचार करूनच आपल्या जातकाला दिशा दर्शन करण्यावर “स्वामी मालिक” विश्वासुन आहे.

शब्दांकन : धीरज वाटेकर

Leave A Reply