शांतीकर्म – १

1

अनारोग्य, वाईट स्वप्न, वाईट नक्षत्र व तिथी यावरील जन्म / मरण आदी गोष्टींनी सूचीत होणारे अरिष्ट किंवा संकटाचे निवारण व्हावे, यासाठी शास्त्रोक्त कार्य करण्यास सांगितले आहे, त्याला शांतीकर्म म्हणतात. ज्याप्रमाणे कोणतेही कवच प्रहारांपासून संरक्षण करते, त्याचप्रमाणे शांतीकर्म केल्याने संभव आघातांचे निवारण होते, त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होत असते. शांतीकर्माचे दोन प्रकार आहेत, शुभशांती व अशुभ योग-निराकरण शांती.

यातील शुभ शांती ही शुभता प्राप्त व्हावी म्हणून केली जाते. यात उदा. वास्तु शांती, उदक शांती, वयोसवस्थाभिध शांती आदींचा समावेश होतो. अशुभ योग-निराकरण शांती ही कोणत्याही व्यक्तीच्या पत्रिकेतील जननदोष निवारण करण्यासाठी, घडून गेलेल्या अशुभ गोष्टी / संकेतांचे निराकरण होऊन काही प्रमाणात का होईना शुभता प्राप्त व्हावी याकरिता केली जाते. यात जननशांती, त्रिपाद नक्षत्र शांती, पंचक नक्षत्र शांती, निधनशांती, आदींचा समावेश होतो. आपल्या शास्त्रात एकूण २७ नक्षत्रे असून ती विविध १२ राशींमध्ये विभागली आहेत. अर्थात सव्वादोन नक्षत्रांची १ रास होते. शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह हा विषय ग्रहांच्या व नक्षत्रांच्या बाबतीत गृहीत धरला जातो. २७ नक्षत्रांपैकी जातकाच्या जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल ते त्या व्यक्तीचे जन्म नक्षत्र मानतात. यात १. भरणी २. कृत्तिका ३. आश्लेषा ४. मघा ५. विशाखा ६. ज्येष्ठा आणि ७. मूळ ही अशुभ मानली जातात. या नक्षत्रांवर जन्मलेल्या बालकांना या नक्षत्रांचा दोष लागू नये म्हणून त्या त्या नक्षत्रांची शांती , होमहवन करण्याबाबत शास्त्रात सांगितले आहे. २७ नक्षत्रे ३ गुणांमध्ये विभागली आहेत. यात १) देवगण : सत्वगुण २) मनुष्यगण : रजोगुण ३) राक्षसगण : तमोगुण यांचा समावेश होतो. देवगणाची १. अश्विनी २. मृगशीर्ष ३. पुनर्वसू ४. पुष्य ५. हस्त ६. स्वाती ७. अनुराधा ८. श्रवण ९. रेवती, मनुष्यगणाची १. भरणी २. रोहिणी ३. आर्द्रा ४. पूर्वाफाल्गुनी ५. उत्तराफाल्गुनी ६. पूर्वाषाढा ७. उत्तराषाढा ८. पूर्वाभाद्रपदा ९. उत्तराभाद्रपदा तर राक्षसगणाची १. कृत्तिका २. आश्लेषा ३. मघा ४. चित्रा ५. विशाखा ६. ज्येष्ठा ७. मूळ ८. धनिष्ठा व ९. शततारका ही नक्षत्र शास्त्रात नोंदवली आहेत.

कोणत्या हेतूसाठी / कारणांसाठी कोणती शांती करावी याबाबत मत्स्यपुराणात पुढील विवेचन उपलब्ध आहे. संकटाच्या व भयाच्या परिहारासाठी अभयाशांती, व्याधिमुक्त होण्यासाठी सौम्याशांती, दुष्काळ व चोरभय निवारणासाठी वैष्णवीशांती, वायूमुळे होणारे क्लेश दूर व्हावे यासाठी वायवीशांती, दुष्काळ व अवर्षण पडू नये यासाठी वारणीशांती, शापभय नष्ट व्हावे यासाठी भार्गवीशांती, गर्भपात होवू नये यासाठी प्राजापत्याशांती, बालकांना स्वास्थ लाभावे यासाठी कौमारीशांती, अग्निभयाचे निवारण व्हावे यासाठी आग्नेयी शांती, अरिष्टबाधा होऊ नये यासाठी नैॠत्तीशांती, वाईट स्वप्न पडू नयेत यासाठी याम्याशांती, धननाश होवू नये यासाठी कौबेरी शांती, वृक्ष, भूमी हानी टाळावी यासाठी पार्थिवीशांती आदी अनेक प्रकारच्या शांती आपल्याकडे आहेत. या सर्व शांतीकर्मासाठी शुभमुहूर्त पाहिले जातात. शांतीकर्म किती मानले वा पाळले जातात हा मुद्दा वेगळा असून या सर्वांचा संबंध मानवी सुसज्ज जीवनाशी जोडला असल्याने सत्प्रवृत्तीची माणसे याकडे आजही सकारात्मक पद्धतीनेच पाहतात, असा अनुभव आहे. आणि अनुभवाच्या आधारावर “स्वामी मालिक” यातील काही आवश्यक सूचना जातकाला सुचवीत असतात.

यातील काही शुभशांतीविषयी आपण जाणून घेऊ या.

वास्तुशांती : वास्तुची निर्मिती होत असताना तेथे वावरणा-या व्यक्तींकडून कळत – नकळत अनेक प्रमाद घडत असतात. तसेच कार्यरत अनेकांच्या प्रवृत्तीस अनुसरून अनेकविध कृती घडतात. शास्त्रात कोणत्याही वस्तूच्या / जीवाच्या निर्मितीची प्रक्रिया चालू असताना त्यावेळी होणा-या संस्कारांना महत्व दिले आहे. यास्तव वास्तुनिर्मिती होताना त्या घरातील पृथ्वीतत्त्वावर घडणारे सूक्ष्म कुसंस्कार नाहीसे करण्यासाठी म्हणजेच वास्तूच्या प्रदूषणामुळे उद्भवणा-या उपद्रवांचे शमन होण्यासाठी वास्तुशांती हा शास्त्रसंमत विधी सांगितला आहे.

उदकशांती : उदक आणि शांती या दोन पदांपासून हा शब्द बनलेला आहे. ‘उदक’ म्हणजे पाणी व ‘शांती’ म्हणजे उपद्रवांचे शमन. पंचमहाभूतांच्या संयोगाने ही आपली संपूर्ण सृष्टी बनलेली आहे. आकाश व अग्नी स्वत: कधीच प्रदूषित होत नाहीत. वायू स्वत: प्रदूषित होतो, त्याचे प्रदूषण ही सामाजिक बाब आहे. इतर दोन तत्त्वे म्हणजे पृथ्वीतत्त्व आणि जलतत्त्व होय. घरात वास्तुरूपाने पृथ्वीचे तर वापरातील पाण्याच्या रूपाने जलतत्त्वाचे अस्तित्त्व असते. पृथ्वी व जल या तत्त्वांचे अनुक्रमे वास्तू व पाणी या रूपांनी प्रदूषण होते तेव्हा ते आपल्या सहज नजरेस येते. परंतु सूक्ष्मस्तरावर जल प्रदूषित झाल्यास घरातील व्यक्तींचे प्रकृतिस्वास्थ्य बिघडते, यातून उद्भवणा-या उपद्रवांचे शमन होण्यासाठी उदकशांती करावी असे शास्त्र सांगते.

वयोसवस्थाभिध शांती : व्यक्तीच्या आयुष्यात बाल्य, तारुण्य व वार्धक्य अशा तीन अवस्था येतात. वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत बाल्य, ५० व्या वर्षांपर्यंत तारुण्य व पुढील आयुष्य सर्वसामान्यपणे वार्धक्याचे मानले गेले आहे. मानवी आयुष्य सामान्यपणे १०० वर्षांचे मानून अर्धे आयुष्य संपताच, ५० व्या वर्षापासून १०० व्या वर्षांपर्यंत दर ५ वर्षांनी एकून ११ शांती शास्त्रात सांगितल्या आहेत. त्या शांती पुढीलप्रमाणे आहेत. ५० व्या वर्षी वैष्णवीशांती, ५५ व्या वर्षी वारुणीशांती, ६० व्या वर्षी उग्ररथशांती, ६५ व्या वर्षी मृत्युंजयमहारथीशांती, ७० व्या वर्षी भैमरथीशांती, ७५ व्या वर्षी ऐन्द्रीशांती, ८० व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शनशांती,८५ व्या वर्षी रौद्रीशांती, ९० व्या वर्षी कालस्वरूप-सौरीशांती, ९५ व्या वर्षी त्र्यंबक-मृत्युंजयशांती, १०० व्या वर्षी महामृत्युंजयशांती. वयोमानानुसार येणारी शारीरिक दुखणी, वियोग, दु:ख सर्वसामान्यांना अटळ असते. शांतीकर्मामुळे उपरोक्त, वियोगामुळे होणारे दु:ख, शोक, मोह इत्यादी मोक्षप्रतिबंधक अडथळे दूर होण्यास मदत होते, असे शास्त्र सांगते.

शब्दांकन : धीरज वाटेकर

Discussion1 Comment

Leave A Reply