वास्तुशास्त्र  (भाग 2)

0

प्रसिद्ध राजा भोज याने मध्य भारतातील मालवा भागावर 11 व्या शतकात राज्य केले. भोज मोठा तत्त्वज्ञानी होता. असे म्हणतात की, त्याचे तळागाळातले विणकर सुद्धा छंदबद्ध संस्कृत काव्यरचना करत असत. राजा भोजने 84 पुस्तके लिहिली होती. यातील एक संस्कृत ग्रंथ ‘समरांगण सूत्रधार’ 80 प्रकरणे असलेला स्थापत्य ग्रंथ आहे. स्थापत्य विषयावर असलेला हा ग्रंथ त्या काळातील सर्वोत्तम ग्रंथ मानला जातो. “स्वामी मालिक” च्या तत्त्वज्ञानांचा हा ग्रंथ एक आधार आहे.

प्राचीन वास्तुशास्त्राचा मूळ उद्देश घरामधे भरपूर उजेड, वारा यावा असा आहे. वास्तुशास्त्राचे सर्वात महत्वाचे तत्त्व म्हणजे घराचा मध्यभाग “ब्रह्मस्थान” मोकळे ठेवावे. जुन्या वाड्याचे, हवेल्याचे, वस्तू रचनांचे मध्यभाग आपणास असे मोकळे ठेवलेले आढळतात. मात्र सध्याच्या स्क्वेअर फूट आकारातील फ्लॅट्मधे हे सर्व नियम पाळणे अवघड बनते. यावर उपाय म्हणून सध्याच्या आपल्या घरामध्ये कमीतकमी साहित्य असावे, घर कायम स्वच्छ (हायजिनिक) असावे. घरातील सर्वच सदस्य हसतखेळत वावरावेत. जेवताना टीव्ही बघण्यापेक्षा सर्वानी एकमेकाशी गप्पा मारत जेवावे. घरामध्ये ऑफिसची टेन्शन येऊ नयेत. आदी काही नवीन नियम तयार करायला हवेत. वास्तुवर विविध आध्यात्मिक संस्कार केल्यानंतर तिला  ‘घरपण’ प्राप्त होऊन तिच्यापासून शुभफळे मिळतात, अशी भारतीय मानसिकता आहे. या मानसिकतेतून वास्तुशांतीची परंपरा सुरू झाली. प्रत्येक वास्तूमध्ये अदृश्य शक्तीचा वास असतो. तिचा बरावाईट प्रभाव घरात राहणा-यावर पडत असतो. म्हणून घरात काही ठिकाणी प्रसन्न वाटते तर काही ठिकाणी उगाचच भय निर्माण होते. हे भावनिक असते असे नाही. एखाद्या वास्तूत प्रवेश केल्याबरोबर वाढलेला श्वसनाचा वेग आपण मोजू शकतो. अश्या वास्तू सदोष मानल्या जातात. दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने रक्ताभिसरण क्रियेवर परिणाम होतो. हृदयाची स्पंदने अनियमित होतात. छातीत धडधडते, म्हणून झोपण्याच्या खोलीची रचना याचा विचार करून बनवावी असे शास्त्र सांगते. ज्या मागे शत्प्रतिशत विज्ञान  आहे.

पुर्वी जागा भरपूर होती त्यामुळे घर रचना निवडीची संधी मिळत होती. आज वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे, शहरीकरण यामुळे मिळेल त्या जागेवर, बांधता येईल तसे घर हीच संकल्पना पुढे आली आहे. फ्लॅट पद्धतीत तर निवडीला काहीच संधी नसते. तरीही आजकाल घराची अंतर्गत रचना करीत असताना वास्तुशास्त्राचा विचार करण्याकडे समाजमान झुकु लागले आहे. ज्या घरामध्ये आपले वास्तव्य असते त्या घराची रचना कशी आहे ?  घरास दरवाजे, खिडक्या किती ?  कोणत्या बाजूस आहेत ?   घराचा मुख्य दरवाजा कोणत्या बाजूस आहे ? कोणत्या दिवशी, कोणत्या वारी व कोणत्या नक्षत्रात आपण त्या घरात प्रवेश केला,घराच्या वास्तुचे पूजन केले अथवा नाही, देवघर कोणत्या दिशेसआहे ?  स्वयंपाक कोणत्या दिशेस केला जातो ?  घरातील पाणी साठविण्याची जागा कोणत्या दिशेस आहे ?  संडास कोणत्या दिशेस आहे ?  झोपण्याची व्यवस्था कोठे आहे ?  आदी अनेक गोष्टींवरती  घरातील सुखसमाधान व आनंद अवलंबून असते, ज्यासाठी हे शास्त्र काम करते. वास्तुशास्त्राच्या नियमांचा आपण रहात असलेल्या जागेशी मेळ घातला आणि त्यानुसार सुधारणा केल्या तर असलेल्या परिस्थितीत निश्चितपणे फरक पडतो. घर मोठे असण्यापेक्षा वास्तुशास्त्राप्रमाणे त्याची रचना आहे किंवा नाही हे पाहणे अत्यंत महत्वाचे असून सध्या तसे समाजमान तयार होते आहे. काही घरात सतत कलह किंवा काही घरात शोकमय वातावरण, त्या घरातील माणसांचे चेहरे सतत दुर्मुखलेले असे आढळतात. काही घरामध्ये घर बांधल्यानंतरच्या काळात आर्थिकहानी आढळून येते. याला मूळ दोष कारणीभूत ठरतात. वास्तुविद्या म्हणजे गृहरचनाशास्त्र.  वस = राहणे,  या धातूपासून वास्तू हा शब्द बनलेला आहे. याचा अर्थ मनुष्याच्या निवासासाठी योग्य भवन असा होतो.  हे शास्त्र वस्तूची नेमकी जागा, तिची लाभदायकता याविषयीचे मार्गदर्शन करते. हे शास्त्र वैज्ञानिक आहे. मध्ययुगात सुप्तावस्थेत असलेल्या या शास्त्राला एकविसाव्या शतकात पुन्हा चालना मिळाली. देशातील अनेक प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंवर या शास्त्राचा प्रभाव आहे. सध्या देशात आधुनिक पध्दतीने घरे बांधली जातात. ही घरे सुंदर व मजबूत असतात परंतु निसर्गानुरूप नसतात. त्यामुळे महानगरात आपण याचे भयावह परिणाम पाहतो आहोत. त्यापासून वाचण्यासाठी वास्तुशास्त्राच्या नियमांच्या , सिध्दांतांच्या आधारे गृहबांधणी आवश्यक सांगितली जाते.  घर, बंगला, फ्लॅट, चाळीमधील एक दोन खोल्या असोत, या घरामध्ये माणसाचे संपूर्ण आयुष्य जाणार असते. त्यामुळे घरामध्ये सतत सुखसमाधान लाभावे, घराला घरपण असावे असे वाटणे स्वाभाविकच आहे. काही घरामध्ये संतती आणि संपत्ती या दोहोंचीही रेलचेल आढळून येते. अशा घरामध्ये माणसे नेहमी सुखी समाधानी व आनंदी दिसतात,  यामागे वास्तुशास्त्र आढळते.

पंचमहाभूतांपासून बनलेल्या संपूर्ण चराचर सृष्टीत मानवाचे शरीरही अंतर्भूत असल्याने वास्तुरचनेतही  पंचमहाभूतांचा विचार केला गेला. चराचर सृष्टी, मानवी शरीर व वास्तू यांच्यात समतोल व सुसंवाद साधला जाईल, अशी वास्तुरचना प्राचीनकाळी विचारपूर्वक तयार केली गेली. सूर्यप्रकाश, वा-यांची दिशा, जमिनीचा उतार, घरासाठी उपलब्ध होणारे क्षेत्र, मातीचा प्रकार, पृथ्वीचे चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण आदी गोष्टींचा विचार करून विविध प्रयोगांद्वारे निष्कर्ष काढले गेले. कालौघात निवारा ही माणसाची प्राथमिक गरज बनली आणि वास्तुशास्त्राची प्रगती झपाट्याने झाली. जगाच्या इतिहासात भारताबरोबरच इतर काही संस्कृती विकसित झाल्या. भारतात या विषयावर अधिक अभ्यास आणि ग्रंथनिर्मिती झाली. विश्वकर्मीय शिल्प, मानसार वास्तुशास्त्र, विश्वकर्मप्रकाश आदी वास्तूग्रंथाबरोबरच बृहत्संहिता, स्कंदपुराण,  अग्निपुराण, गरुड पुराण, तंत्रग्रंथ यांतही या संबंधीचे विस्तृत विवेचन आपणास पाहावयास मिळते. या सा-या  ग्रंथांचा अभ्यास आपण “स्वामी मालिक” म्हणून कार्यरत होताना केला आहे.

शब्दांकन : धीरज वाटेकर

Leave A Reply