देवघर आणि मुर्तिशास्त्र

0

हिंदू जीवन पद्धतीत घर म्हटले की देवघर आलेच. आणि देवघर म्हटले की प्रथा, परंपरा, देवमूर्ती, शास्त्र सारे आले. या सर्व बाबतीत अनेकदा अनेकांच्या मनात अनेकविध संभ्रम तयार होतात. यास्तव त्याबाबतचे महत्वाचे विवेचन क्रमप्राप्त ठरते.

मूळ कुटुंबाचा कुळाचार ज्या घरात होतो, त्या घरातील कोणत्याही प्रकारची मूर्ती, टाक, पूर्वजांनी ठेवलेले नारळ, विविध दगड (दैवी अंशस्वरुप) हे सारे इतरत्र नवीन ठिकाणी शक्यतो हलवू नयेत. मूळ घर वगळता इतर नवीन घर, फॅक्टरी, दुकान, कार्यालय यांत मुख्यत्वे 5 प्रकारच्या, 6″ पेक्षा कमी उंचीच्या मूर्त्या अथवा फोटो ठेवावेत. कोणत्याही धातूची मूर्ती ही भरीव असावी. फोटो सुस्पष्ट असावेत, थ्रीडी नसावेत. देवतांची मांडणी जातकाच्या उजव्या हाताला गणपती, मध्यभागी गुरुस्थान (या मूर्ती अथवा फोटोला उंचीची मर्यादा नाही), त्याच्या समोर श्रीयंत्र, त्याच्या उजव्या बाजूस विष्णू देवता अथवा बाळकृष्ण मूर्ती, अण्नपूर्णा माता, कुलदैवतेचा टाक, कुलस्वामिनी, कुलदैवत यांपैकी काहीही…, श्रीयंत्रासमोर धातूचे भरीव शिवलिंग (पार्यापासून बनलेले “पारध” शिवलिंग उत्कृष्ट) असावे. मृत व्यक्तीचे फोटो अथवा टाक देवघरात पुजू नयेत. घरात ते शयनगृह (बेडरूम) वगळता कोठेही लावावेत. देवघरात अधिक मूर्त्या अथवा फोटो ठेवू नयेत. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे दिवाणखान्यात/बेडरुममध्ये देवाची मूर्ती अथवा प्रतिमा लावू नये. मात्र महिला गर्भार असतील, तर त्यांच्या शयनगृहात बाळगोपाळाची प्रतिमा लावण्यास मान्यता आहे. मंदिरात कुलदैवत – कुलदेवता, घंटी, गणेशमूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख, आराध्यदैवत असावयास हवे. देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मुर्त्या नसाव्यात. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा (डाव्याबाजूस) व दोन अगरबत्ती (उजव्याबाजूस) लावाव्यात. आठवड्यात किमान एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावा. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे. तसेच पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलंझाडं लावावी. सुखलेलं झाड नसावे. पूर्व/उत्तर/ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा केली जावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे. देवघरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी. पूजेचे निर्माल्य घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे. अपवाद वगळता मूर्त्या अथवा फोटो शक्यतो कोणाला भेट स्वरुपात देऊही नयेत. भंगलेल्या, तुटलेल्या मूर्त्या, वाळवी लागलेले फोटो घरात ठेवू नयेत. घरातील मूर्त्या अथवा फोटो दक्षिणेला तोंड करून ठेवू नयेत. घरात ठेवता न येण्याजोगे फोटो, मूर्त्या कोणत्याही मंगळवारी दुपारी बारा वाजण्यापूर्वी पाटावर घेऊन पंचोपचार पूजा करावी. साखर अथवा खीरीचा नैवैद्य दाखवून क्षमा प्रार्थना मागावी. दुपारी तीननंतर नदीच्या वाहत्या प्रवाहात विसर्जन करावे. अथवा योग्य त्याठिकाणी (मंदिर वगैरे) ठेवावेत. आयुष्यात “जाऊ तेथून मूर्ती आणू” हा प्रकार बंद करण्याचा प्रयत्न करावा. कारण यातून मूळ धार्मिकता कमी होऊन लक्ष विचलित होते.

देवपूजा हा उपचार समर्पण विधी होय. पूजकाने स्नानकरून स्वच्छ धूतवस्त्र, रेशमी वस्त्र किंवा लोकरीचे वस्त्र धारण करून आसनावर बसावे. आपल्या देव्हा-यातील देवावरचे निर्माल्य बाजूला करावे. आचमन, प्राणायाम, इष्टदेवता स्मरण आणि देशकालांचा उच्चार करून पूजेचा संकल्प सोडावा. गणपतीचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दीप यांची गंधाक्षतपुष्पाने पूजा करावी. शंखात पाणी भरून पूजासाहित्य आणि स्वतःचे शरीर यांचे प्रोक्षण करावे व देवाच्या ध्यानाचा मंत्र म्हणून भक्तिपूर्वक देवतेचे आवाहन, देवतेला आसनप्रदान, देवतेची पाद्यपूजा, अर्ध्यप्रदान, आचमनीय प्रदान, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनूलेपन, पुष्प, धूप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प हे १६ उपचार पूर्ण करावेत. असेही शास्त्र आहे. यास ‘षोडशोपचार पूजा’ म्हणतात. मंत्रपुष्पसमर्पणानंतर आपले आवाहन, विसर्जन पूजा यासंबंधीचे अज्ञान प्रकट करून परमेश्वराची क्षमा मागितली जाते. ज्यांची ध्यानशक्ती चांगली आहे, मनाची एकाग्रता ज्यांना चांगली साधते त्यांना हे सगळे उपचार मनाने कल्पून, मनामध्ये देवतेची मूर्ती आणून त्यांचे समर्पण केलेले चालते. कारण आपल्याकडे मानसपूजेला बाह्य पूजेइतकेच महत्त्व आहे.

देवघरातील परमेश्वराच्या मूर्ती, पूर्व किवा पश्चिम दिशेकडे असाव्यात. गणपती, श्रीलक्ष्मी व सरस्वती यांच्या उभ्या अविर्भावातील मूर्ती, नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका मूर्ती टाळाव्यात. भैरव़, नरसिंह व दुर्गा या देवतांची स्थापना दक्षिणायनाच्या काळात करावी. देवघरात देवता कधीही कोप-यात नसावेत. देवघराचे दार सहसा उत्तर किवा पूर्व दिशने ठेवावे. घराची इमारत एकापेक्षा जास्त माळ्यांची असल्यास देवघर तळमजल्यावर असावे. देवघरासाठी पांढरा किवा पिवळा रंग शुभ होय. देवघराजवळ चपला किवा वहाणा ठेवल्यास कुटूंबात वाद, कलह वाढतो. देवघर किवा पूजाघरात कसल्याही प्रकारची टाकाऊ सामग्री ठेवू नये. संसारी माणसांनी देवघरात बाल ब्रह्मचारी मारूतीचे पूजन करू नये, ह्यांमुळे वंश खंडीत होण्याची शक्यता असते. शनिची किंवा शनियंत्राची पूजा देवघरात करू नये, त्यामुळे जीवन संकटमय होते. घरात देवासाठी स्वतंत्र खोली शक्य नसेल तर देवघर हे शयनगृह सोडून कुठेही करावे. देवघराचे छत चपटे असावे. पूजा करताना पूजकाचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. दिवा आग्नेय कोप-यात (देवघराच्या), पाणी उत्तरेकडे ठेवायला हवे. पूजेत शंख-घंटीचा उपयोग आवर्जून करावा. पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोप-यात शिंपडले जावे. नैवैद्य नेहमी गोड वस्तूंचाच दाखवावा. एकाच घरात 2/3 देवघरे हे वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे.

वास्तवात यथाशक्ती, यथामती, उपलब्ध उपचारांनी देवपूजा मनोभावे केली तर मनाला शांती मिळते, घरातील वातावरण पवित्र होते, प्रसन्नता प्राप्त होते, आणि आपले कर्म करायला उत्साह मिळतो. देवपूजा करणा-यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते, अंगीकृत कार्याला यश येते असा अनुभव सांगतो. देवपूजा हा विश्व चैतन्याला आवाहन करीत कृतज्ञनता व्यक्त करण्याचा सकारात्मक विधी आहे.

शब्दांकन : धीरज वाटेकर

Leave A Reply